श्री साईबाबा भव्यरथ पालखी सोहळ्याचे आयोजन

श्री साईबाबा भव्यरथ पालखी सोहळ्याचे आयोजन
शिर्डी:- शिर्डी जवळील निमगाव येथील श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री साईबाबा भव्यरथ पालखी सोहळा श्रीक्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असा मंगळवार ६ ते गुरुवार १५ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर निमगाव शिर्डी चे महंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज यांच्यावतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.या पत्रकात म्हटले आहे की, श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस यांच्या शुभ प्रेरणेने वह भ प विश्राम महाराज ढमाले यांच्या मार्गदर्शनाने श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य स्वरूपात श्री साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळा निघणार असून या दिंडीचे मंगळवार सहा जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईंच्या रथाचे व दिंडीच्या पालखीचे पूजन करून प्रस्थान होणार आहे.शिर्डी, जवळके, पांगरी, सिन्नर देवळाली कॅम्प, नाशिक अंजनेरी, तळेगाव, असा मजल दरमजल पायी दिंडी प्रवास करत १३ जानेवारीला हा पायी दिंडी साहळा, हरिपाठ आश्रम, त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. बुधवार १४ जानेवारी रोजी त्रिंबकेश्वर येथे दर्शन तसेच गुरुवार दिनांक १५ जानेवारीला सकाळी सात ते नऊ या वेळेत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर कै. ह भ प राधूबाबा मुरडनर यांच्या स्मरणार्थ संतोष अशोक मुरडनर व परिवार कोपरगाव यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.




