श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थान विषयी विविध समाजमाध्यमांतुन आक्षेपार्ह विधाने करणारे गौतम खट्टर यांनी राहता न्यायालयात हजर राहून केली चूक मान्य

शिर्डी : (प्रतिनिधी)
श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थान विषयी विविध समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे गौतम खट्टर यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले की, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले गैरसमज माझे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.”
सन २०२३ मध्ये श्री साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर, श्री साईबाबा संस्थानने अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहाता येथील न्यायालयात कायदेशीर दावा दाखल केला होता, ज्यामध्ये अजय गौतम व गौतम खट्टर यांचा समावेश होता. त्यापैकी अजय गौतम यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपली चुक मान्य करुन मा. राहाता न्यायालयात माफीनामा सादर केला होता. याचप्रकारे गौतम खट्टर यांचेही गैरसमज दूर झाल्याने, आज त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की त्यांच्या पूर्वीच्या विधानांचा आधार हा अपुऱ्या माहितीतून झालेल्या गैरसमजांवर होता.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत गौतम खट्टर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थानचे माजी विश्वस्त श्री मोहन जयकर, विधी अधिकारी गोरक्षनाथ नलगे व राहाता न्यायालयाचे वकिल अॅड. राजेश नाईक यांनी समन्वय साधला.



