कोपरगाव- येवला -मनमाड चौपदरी काँक्रीट रस्त्यासह येवला बाह्यवळण रस्त्याच्या प्रकल्प अहवालाबाबत बैठक.

शिर्डी: (प्रतिनिधी) कोपरगाव येवला-मनमाड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव-येवला-मनमाड एन.एच. १६० आणि एन.एच. ७५२ या महामार्गांच्या चौपदरी कॉंक्रिट रस्त्यासह येवला बायपास रस्त्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या महामार्गासह येवला शहर बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलद गतीने पूर्ण करून सादर करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.
एन.एच. १६० आणि एन.एच. ७५२ या राष्ट्रीय महामार्गांच्या काँक्रीट चौपदरीकरणासह येवला बायपास रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करताना येवला शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पर्यायी मार्ग निवडावा, तसेच प्रस्तावित मार्गास आवश्यक प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला-मनमाड रस्त्यावरील वाहनांची वाढती गर्दी व वर्दळ लक्षात घेता पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्याचा मुद्दा मांडला. त्यादृष्टीने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ या सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार,अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंखे,नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एनएचएआय प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागाचे विजय कोथळे, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता सा.बां. नाशिक मुकेश ठाकूर, येवला नगर परिषद मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.




