भाविकांच्या सुविधेसाठी नवीन सबका मालिक एक मार्केट परिसरात लाडू प्रसाद काउंटर सुरू

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नगर–मनमाड महामार्गालगत नव्याने सुरू झालेल्या सबका मालिक एक मार्केट परिसरातील जागेत लाडू प्रसाद काउंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या निर्देशानुसार ही सुविधा सुरू करण्यात आली असून, या लाडू प्रसाद काउंटरचे औपचारिक उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह सर्व नगरसेवक, श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, अतुल वाघ, लाडू प्रसाद निर्मिती विभाग प्रमुख रविंद्र गायके तसेच शिर्डी नगरपरिषद व साईबाबा संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
नगर–मनमाड महामार्गालगत मुख्य रस्त्यावर ही सुविधा सुरू झाल्यामुळे या मार्गावरून तसेच प्रसादालयाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या साईभक्तांना लाडू प्रसाद खरेदी करणे अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे मंदिर परिसर, भक्तनिवास व प्रसादालयाकडे जाणाऱ्या भाविकांना प्रसाद खरेदीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध झाली आहे.
भाविकांना साईबाबांचा प्रसाद सहज उपलब्ध व्हावा, त्यांचा वेळ वाचावा आणि शिर्डीतील दर्शन तसेच प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम भाविकांच्या सुविधेला प्राधान्य देणारा असून, शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी उपलब्ध सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.




