श्री साई संस्थान सोसायटीच्या कार्यालयात तब्बल साठ वर्षानंतर संस्थेचे संस्थापक व चेअरमन कै. बळीराम कोते पा. यांचे तैलचित्र सन्मानाने विराजमान झाले

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साई संस्थान क्रेडिट को.आप. सोसायटीच्या कार्यालयात एक ऐतिहासिक भावनिक सोहळा पार पडला. संस्थेचे मुहूर्तमेढ रोवणारे संस्थापक चेअरमन कै. बळीराम बयाजी कोते पाटील यांचे तैलचित्र तब्बल साठ वर्षांनंतर सोसायटीच्या कार्यालयात सन्मानाने विराजमान झाले याप्रसंगी कोते कुटुंबीय आणि उपस्थितीतानी विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार व सर्व संचालक मंडळ यांचे विशेष आभार मानले. ६० वर्षाची अपेक्षा संपली
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को.ऑप शिर्डी सोसायटीची स्थापना १९५७ मध्ये कै. बळीराम बयाजी कोते पाटील यांनी स्थापन केली होती. या घटनेला ६० हुन अधिक वर्ष लोटली आणि या काळात २९ मान्यवरांनी चेअरमनपद भुषविले मात्र दुर्दैवाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. बळीराम कोते पाटील यांचे छायाचित्र कार्यालयात लावले गेले नव्हते. विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळ यांनी पदभार स्वीकारताच जुन्या नोंदी पाहिल्या आणि संस्थेच्या संस्थापकाचे छायाचित्र शोधून ते संस्थेच्या कार्यालयात सन्मानाने लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख कमळाकर कोते यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले आजवर आमच्या कोते कुटुंबातील आठ सदस्य या संस्थेचे चेअरमन झाले. पण कोणालाही संस्थेची संस्थापक कै. बळीराम कोते पा.यांची आठवण झाली नाही. ज्यांनी झाड लावले. त्यांनाच आपण विसरलो होतो. मात्र माझे मित्र विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी चूक सुधारत बळीराम पाटलांचा सन्मान केला. हे आम्हाला अभिमानास्पद आहे. तसेच भविष्यात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी घराची सोय करावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते सुभाष तात्या कोते यांनी कार्यालयासाठी जागा हवी असल्यास ग्रामस्थ मदत करतील तसेच त्यांनी विद्यमान संचालक मंडळाचे कौतुक केले ते म्हणाले साठ वर्षानंतर संस्थेच्या संस्थापकाची आठवण झाली. ही खरी कौतुकाची बाब आहे. आता संस्थेचे कार्य वाढले असून संस्थेला स्वतंत्र व भव्य कार्यालयाची गरज आहे. जर जागेची अडचण असेल तर शिर्डीतील ग्रामस्थ तुम्हाला हवी ती मदत करतील पण संस्थेचा वटवृक्ष असाच बहरत ठेवा.
संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की संस्थेच्या संस्थापकाचे ऋण फेडण्याचे भाग्य मिळाले. तसेच श्री साईबाबा संस्थान मधील हजारो कामगारांच्या संसाराला हातभार लावणारी ही संस्था आज कामधेनू ठरली आहे. बळीराम कोते पाटलांनी लावलेल्या या रोपट्याचे आज भव्य असे वटवृक्ष झाला आहे. त्याचा वारसा चालवताना अणि कार्यालयामध्ये कै .बळीराम कोते पाटलांचा तैलचित्र लावताना मला मनस्वी आनंद होत आहे. हा सोहळा केवळ तैलचित्र अनावर नसून कृतज्ञेचा आणि जुन्या व नव्या पिढीला जोडणारा दुवा ठरला आहे.
या सोहळ्यासाठी बळीराम कोते पाटील यांच्या सुपुत्र अर्जुन कोते बंधु गोपीनाथ कोते संजय कोते पंकज कोते ज्येष्ठ नेते सुभाष तात्या कोते गंगाधर कोते अशोकराव कोते मोहन कोते तसेच शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके ज्ञानेश्वर आबा गोंदकर तसेच संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते आणि सर्व संचालक मंडळ ग्रामस्थ सभासद व व संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.




