बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी जेरबंद अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व लोणी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई
शिर्डी (प्रतिनिधी)दि.२९/०४/२०२६ रोजी मा. श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसमांकडून निर्मळ पिंपरी शिवारात ता. राहता येथील निळवंडे शेजारी असलेल्या खोलीमध्ये महिलांकडून १०,०००/रु घेऊन त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करण्यात येत असून सदर ठिकाणी जाऊन खात्री करणे कामी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील म. पो. स. ई. बेबी अण्णा शिंदे पो.हे. कॉ. दादासाहेब लोंढे पो.हे. कॉ. संदीप दरंदले पो.हे. कॉ. सचिन धनाड पो. कॉ. अशोक गाडे पो. कॉ. राजेंद्र बिरदवडे यांना स.पो.नि. युवराज आठरे लोणी पोलीस स्टेशन यांचे पथकासह जाऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.
नमूद पथक लोणी पोलीस स्टेशन येथे येऊन बातमीतील हकीकत स.पो.नि युवराज आठरे लोणी पोलीस स्टेशन यांना सांगितल्यानंतर स.पो.नि. युवराज आठरे यांनी लगेच डॉ. स्वाती गोपाळराव पवार, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लोणी ता – राहता जिल्हा -अहिल्यानगर त्यांच्यासोबत डॉ. गोकुळ नानासाहेब घोगरे तालुका समुचित अधिकारी पी.सी.पी.एन.डी.टी. तसेच दोन शासकीय पंच, लोणी पोलीस स्टेशन येथील पो.स.ई. आशिष चौधरी पो.हे. कॉ. अशीर सय्यद, साईनाथ राशिनकर पो.ना. सचिन शेवाळे, भोईटे राहता पोलीस स्टेशनचे म.पो.स.ई. कोमल कुमावत फोटोग्राफर श्री प्रमोद पवार यांना लोणी पोलीस स्टेशन येथे बोलावून बातमीतील हकीगत समजावून सांगून बनावट गरोदर महिला ग्राहक पाठवून खात्री करणेबाबत सापळा रचला.
त्याप्रमाणे नमूद पथक व बनावट ग्राहक यांनी बातमीतील सदर ठिकाणी जाऊन दिलेल्या सूचनेनुसार खात्री करण्यासाठी पाठवले असता तिथे गर्भनिदान तपासणी सुरू असल्याची खात्री झाल्याने त्यांनी पथकास मोबाईल द्वारे कळवीले. त्यानुसार नमूद पथकाने सदर ठिकाणास चारही बाजूने घेरून घेऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन खोल्याचे घर एका घरात दोन पुरुष व बनावट महिला पोलीस ग्राहक मिळून आले सदर इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव डॉ. राहुल आबासाहेब भनगे वय ३४ वर्ष धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर रा भानस हिवरे.ता. नेवासा जि. अहिल्यानगर, अभिजीत दिलीप भुसाळ वय ३० वर्षे धंदा जे. एन. एम. नर्सिंग,रा निर्मळ पिंपरी ता- राहता जिल्हा-अहिल्यानगर असे सांगितले त्यांना सदर ठिकाणी काय करत आहात अशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही गरोदर महिलांकडून प्रत्येकी १०,०००/रुपये घेऊन यांची यु.एस.जी. मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी करून गर्भ मुलगा आहे की मुलगी याची त्यांना माहिती देतो व गर्भवती महिलांना आमच्याकडे तपासणी करिता एजंट अभिजीत भुसाळ यांनी आणल्याचे आरोपी डॉ. यांनी सांगितले तसेच तेथील गर्भलिंग निदान करण्याकरता आलेल्या ०८ महिला कडे विचारपूस केले असता त्या महिला बीड नाशिक नांदगाव संगमनेर पुणे येथून त्यांच्या नातेवाईकासह आल्या असून त्या ३ते४ महिन्याच्या गरोदर आहेत व त्यांचे नातेवाईक बाभळेश्वर येथे थांबले असून त्या महिलांना इंडिका वॅगनर कारमध्ये सदर ठिकाणी गर्भलिंग निदान तपासणी करता आणण्यात आले आहे.



