Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर मध्ये संगीत नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0 1 3 5 8 0

*पहिल्याच दिवशी ‘संत कान्होपात्रा’च्या प्रयोगाला रसिकांची मोठी गर्दी*

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘संगीत नाट्य महोत्सवा’ला अहिल्यानगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माऊली सभागृह येथे आयोजित या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाट्यप्रयोगाला नाट्यरसिकांची मोठी गर्दी झाली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महोत्सवाचा प्रारंभ झाला.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी श्री. सुरेश साखळकर, ज्येष्ठ संगीतकार पंडित डॉ. विकास कशाळकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विजयकांत कुलकर्णी आणि श्री. मुकुंद मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मराठी संगीत रंगभूमीच्या समृद्ध आणि वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने दि. २५ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे विविध संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येत आहेत. या महोत्सवातील सर्व प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य असून, पहिल्याच दिवशी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत नाट्यपरंपरेप्रती असलेली आपली आस्था व्यक्त केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ हा संगीत नाट्यप्रयोग बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे यांच्या वतीने सादर करण्यात आला. या नाटकाचे लेखक ना. वि. कुलकर्णी, संगीत मास्टर कृष्णराव आणि दिग्दर्शक श्री. सुरेश साखळकर आहेत. अभिजात संगीत, प्रभावी अभिनय आणि दर्जेदार रंगमंचीय सादरीकरण यामुळे या प्रयोगाला रसिकांची विशेष दाद मिळाली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ‘डागा परी’ हा संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या प्रयोगाचे लेखक व संगीत पंडित डॉ. विकास कशाळकर असून, दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांचे आहे. या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण श्रुती संगीत निकेतन, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ‘संशय’ हा प्रसिद्ध संगीत नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखक गो. ब. देवल असून, दिग्दर्शक श्री. मनोहर जोशी आहेत. या प्रयोगाचे सादरीकरण खल्वायन, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

संगीत, नाट्य, अभिनय, साहित्य आणि गायन यांचा सुरेख संगम असलेल्या संगीत नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा संगीत नाट्यकलेविषयी रसिकांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक ठरला आहे.

अहिल्यानगर व परिसरातील नाट्यरसिक, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि सांस्कृतिकप्रेमींनी पुढील दोन दिवसांच्या संगीत नाट्यप्रयोगांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे