आरपीआयचा एकनिष्ठ ठाण्या वाघ हरपला-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेयांनी घेतली स्वर्गीय राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट
शिर्डी (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी आज शिर्डी दौऱ्यादरम्यान वाकडी येथे स्वर्गीय राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कापसे यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी यावेळी राजाभाऊ कापसे यांच्या पक्षनिष्ठेचा विशेष उल्लेख केला. “आरपीआयचा एकनिष्ठ ढाण्या वाघ हरपला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजाभाऊ कापसे हे पक्षाच्या स्थापनेपासून आरपीआयशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते होते. पक्षाच्या वाटचालीत त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत आठवले यांनी कापसे यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाशी निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत आठवले यांनी सुरेंद्रभाऊ थोरात, पप्पूभाऊ बनसोडे, नानाभाऊ त्रिभुवन, जालिंदर वाकचौरे आदींच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी शिर्डी येथील आरपीआयचे शहराध्यक्ष नाना त्रिभुवन यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच शिर्डी येथे त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदही पार पडली.
केंद्रीय मंत्री आठवले यांच्या या दौऱ्यामुळे आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



