श्री रामनवमी उत्सवानिमित्त पायी येणाऱ्या साई भक्तांच्या पालखी सोहळ्याचे नाशिक- सिन्नर रोडवर श्री साईबाबा संस्थान तर्फे उत्साहात सहर्ष स्वागत

शिर्डी : (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थानतर्फे श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून पायी येणाऱ्या साईभक्तांच्या पालखी सोहळ्यांचे नाशिक–सिन्नर रोडवर उत्साहात स्वागत करण्यात आले. संस्थानचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पालखी मंडळांना भेट देत भाविकांशी संवाद साधला.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परंपरा जपत मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्यात काही अंतर पदयात्रींसमवेत पायी चालत भक्तिभावाचा अनुभव घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या पत्नी सौ. वंदना गाडिलकर यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी साईभक्तांच्या सेवेसाठी संस्थान सदैव तत्पर असल्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी श्री साईबाबा संस्थानतर्फे पालखी पदयात्रेकरिता विविध ठिकाणी कीर्तन / प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, पदयात्रींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची सुविधा तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे हजारो पदयात्रींना मोठा दिलासा मिळत आहे.
श्रीरामनवमीच्या पावन पर्वात साईभक्तांच्या या पदयात्रेला संस्थानतर्फे दिलेले स्वागत हे श्रद्धा, सेवा आणि समर्पणाची परंपरा अधिक दृढ करणारे ठरत आहे.




