Breaking
ब्रेकिंग

एकल महिलांच्या वारस नोंदी करा, मिलिंद कुमार साळवे यांची मिशन वात्सल्य समिती बैठकीत सूचना.

0 0 6 5 1 0

श्रीरामपूर: शौकत भाई शेख/
राज्य सरकारने हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत एकल महिलांच्या वारस नोंदी मिशन मोडवर प्राधान्यक्रमाने लावाव्यात, अशी महत्त्वपूर्ण सूचना बुधवारी मिशन वात्सल्य शासकीय समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केली.
एकल महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या तालुकास्तरीय मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक श्रीरामपूर तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी झाली. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ अहिल्यानगर येथे जनगणना विषयक बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकुन अभया राजवळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. समितीच्या सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी मागील बैठकीचा आढावा सादर केला. तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, नगरपालिकेचे समूह संघटक हरिष पैठणे यांची उपस्थिती होती.
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांचे मंडळनिहाय आयोजन केले आहे. यात मंडळ स्तरावर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. तसेच गरजूंना उत्पन्न, रहिवाशी, जातीचा दाखला असे विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असणारे दाखले दिले जाणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी, समस्यांची सोडवणूक केली जाणार असल्याचे अव्वल कारकुन राजवळ यांनी सांगितले. पतीच्या निधनानंतर एकल महिलांची नावे त्यांच्या सासरच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर वारस म्हणून लावण्यात अडचणी येतात. वारस नोंदीसाठी वारस म्हणून एकल महिलांनी स्वतःहून अर्ज केल्याशिवाय त्यांची नावे सरकार दप्तरी सातबारा उतारा, मालमत्ता पत्रिका, शिधापत्रिका अशा वेगवेगळ्या शासकीय कागदपत्रांमध्ये नोंदविल्या जात नाहीत. त्यामुळे अर्जाची वाट न पाहता पतीच्या मृत्यूनंतर एकल महिलांच्या वारस नोंदी शासकीय यंत्रणेने या राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरात सक्तीने कराव्यात, अशी सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली. त्यावर राजवळ यांनी याबाबत तहसीलदारांशी चर्चा करून संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे सांगितले.
अंगणवाडी सेविकांमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात १० हजार ७०० एकल महिलांची नोंद झाली आहे. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची यादी संबंधित विभागांना दिल्याचे प्रकल्पाधिकारी शिंदे यांनी सांगितले.

*श्रीरामपुरात सर्वेक्षण संथगतीने*
एकल महिलांचे सर्वेक्षण ग्रामीण भागात पूर्ण झाले आहे. पण श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत या सर्वेक्षणास गती आलेली नाही. त्यामुळे शहरातील एकल महिलांची निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही.

*अधिकाऱ्यांना नाही गांभीर्य*
राज्य सरकारने सर्व प्रकारच्या एकल महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली मिशन वात्सल्य शासकीय समिती गठीत केल्या आहेत. मात्र बैठकीबाबत विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची बाब बुधवारी अधोरेखित झाली. या बैठकीस गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अशा प्रमुख विभागांचे अधिकारी गैरहजर होते. याबाबत साळवे व बाळासाहेब जपे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे